टॉप ५ आहारविषयक भ्रमनिरास

गेल्या काही वर्षात आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्चात्य पदार्थ पण खातो, करून बघतो. तसेच, आपली आरोग्य आणि आहारा विषयी जागरूकता देखील वाढली आहे. तर जेव्हा आपल्याला एवढ्या माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याच बरोबर बरेच समज गैरसमज पण उदभवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे. जर ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही समज, प्रश्न असतील तर मला जरूर कळवा, मी त्याचे समाधान करण्याचा जरूर प्रयत्न करेन.

१. खूप पाणी पिऊन वजन कमी होते
मी बऱ्याच सिनेतारीकांच्या मुलाखतीत वाचलेले आहे ‘माझ्या सौंदर्य आणि सुडोल फिगर चे रहस्य म्हणजे पाणी’- असं सांगणारी ती सुंदरी, तिने केलेल्या आहारनियंत्रण आणि व्यायाम ह्या बद्दल काहीच सांगत नाही. अर्थात करीना कपूरने फिटनेस पॉप्युलर करण्या पूर्वीचं हे उदाहरण आहे. पण आज देखील, बऱ्याच लोकांना असं वाटतं कि खूप खूप पाणी प्यायल तर शरीरातली चरबी सुद्धा वितळून निघून जाते. हा एक भ्रम आहे. पाणी पिणे हे अगदी अत्यावश्यक असते, ते शरीरातल्या बऱ्याच हानिकारक किंवा अनावश्यक पदार्थांना बाहेर फेकतं पण त्यात अतिरिक्त चरबी चा समावेश होत नाही. आपल्या शरीरातली चरबी हि फक्त व्यायाम आणि संतुलित नियंत्रित आहाराने कमी होते.

२. सगळे फॅट हानिकारक असतात
हा बहुदा सर्वात जुना गैरसमज असेल. ‘सगळे’ फॅट (तेल, तूप, दुग्धजन्य पदार्थ, दाणे, काजू किशमिश) वाईट नसतात. उलट आपल्या सगळ्यांना थोड्या विशिष्ट फॅट ची रोजच्या आहारात गरज असते. उ. दा. म्युफा, प्युफा, इसेन्शियल फॅटी अ‍ॅसीड जे आपल्याला ओलिव्ह ओईल, सोय बीन ओईल, सन फ्लॉवर ओईल, करडी ओईल, शेंगदाणा तेल व अखरोड, पिस्ता, काजू आणि मासे ह्यातून मिळते. फॅट शरीरातल्या पेशींचे आरोग्य जपत, विटामिन अ, ड, ई, क ह्याच्या पचनात मदत करतं आणि सगळ्या मज्जातंतूंचे स्वास्थ्य संभाळत. अर्थात अती तेलयुक्त किंवा फॅट रीच आहार असेल तर वजन नक्कीच वाढते पण त्याचा अर्थ सगळे फॅट हानिकारक असतात असं होत नाही.

३. फॅट फ्री = लो कॅलोरी
हा आधुनिक हेल्थ फूड संस्कृती चा मोठ्ठा गैरसमज आहे. फॅट फ्री म्हणजे त्यात कॅलोरी पण कमी असतात किंवा त्याने वजन वाढत नाही असे अजिबात नाही. उलट एक सोप्पा निर्देश म्हणजे, जर फॅट कमी असेल तर पदार्थात साखरेचे किंवा तत्सम प्रमाण वाढवलेले असते. तसेच शुगर फ्री पदार्थात इतर फॅट चे प्रमाण जास्त असते. आणि बेक्ड म्हणजे लो कॅलोरी असं नेहमीच नसतं. तर म्हणून, कायम nutrient लेबल वाचूनच पदार्थाची निवड करावी!

४. जास्त साखर खाऊन मधुमेह होतो
नाही. तुम्हाला जर मधुमेह असेल, तर जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाऊन तुमच्या रक्तातल्या ग्लुकोज चे प्रमाण वाढेल. पण तुम्हाला मधुमेह नसेल तर, फक्त जास्त साखर खाल्ल्या मुळे तुम्हाला हा आजार होत नाही. तसेच, आहारात अजिबात वरून साखर घातलेले पदार्थ नसतील तरी तुम्हाला मधुमेह होणार नाही ह्याची खात्री देता येत नाही, कारण- मधुमेह होण्या मागे बरीच अनुवंशिक व इतर कारणं असतात जसे अती वजन असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित व असंतुलित आहार, मद्यपान ई. साधारण गोड पदार्थ कॅलोरी व फॅट रीच पण असतात आणि म्हणून त्याने वजन वाढून, मधुमेह होण्याची शक्यता वाढते. म्हणून रोजच्या रोज गोड धोड, तळलेले पदार्थ खाणे टाळावेत.

५. रात्री उशिरा खाल्लं कि वजन वाढते
काही वर्षांपूर्वी, ४ पी. एम. डाएट नावाचे फॅड आले होते. तेव्हापासून खूप लोकांची अशी समजूत झाली आहे कि रात्री अपरात्री खाल्लं कि जास्त वजन वाढतं. आपलं शरीर वेळ बघून पचनक्रिया कशी करायची हे ठरवत नसतं. नाहीतर, दिवसा भरपूर केक, पेस्ट्री, पिझ्झा आणि रात्री फक्त सलाड असं खाल्लं तरी मग वजन वाढायला नको मग? पण तसं होत नाही. वजन वाढणं किंवा कमी होणं हे पूर्णपणे दिवसभरात (आणि रात्रीत) आहारात असलेल्या कॅलोरीस वर आधारित असतं. पण एका निरीक्षणानुसार, अपरात्री खाल्ले जाणारे पदार्थ हे मुळातच खूप कॅलोरी रिच असून त्याने मेदोवृद्धी होते उ. दा. आईस्क्रीम, केक, पेस्ट्री, चॉक्लेट इ. तर वजन वाढीचा संबंध ‘कधी’ खातोय ह्याच्याशी नसून ‘काय’ आणि ‘किती’ खातोय ह्याच्याशी असतो!

Advertisements
Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

अति जेवण झाल्यावर काय कराल ?

‘गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?’ असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग – ‘अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!’ ‘अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!’ ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार. आपला आवडता पदार्थ आपल्या समोर आला, कि तो मोजून मापून खाणं हे खूपच अवघड जातं. त्यातून कोणाकडे जेवायला गेलो कि आग्रह करण्याची पद्धत. बायका तरी त्यामानानं आग्रहाला कमी बळी पडतात पण पुरुष मंडळींची काही त्यातून सुटका होत नाही. तर अश्यावेळी जेव्हा अति जेवण होतं तेव्हा (डाएट च्या दृष्टीने) काय कराल?

‘सकाळी जास्त जेवण झालं कि मी रात्रीचं जेवतच नाही. वीकेंड ला खूप खातो आणि मग सोमवारचा उपास करतो. जास्त खाल्लं की मी सकाळ संध्याकाळ जीम ला जातो, कॅलोरीस बर्न करायला. आता मी ठरवलंय, पुढच्या महिन्या पासूनच परत डाएट सुरु करायचं. नाहीतरी एवढं खाणं झालंच आहे, मग एकदमच सगळं उतरवू! ‘. खरंच असं करून वजन कमी होतं का? किंवा कॅलोरीस जास्त वापरल्या जातात का?

अति जेवलात? काळजी करू नका. म्हणजे, एकदा जास्त जेवलात तर काळजी करण्या सारखं काही नाहीये (रोजचा नेम झालं तर मग… ). अधून मधून जास्त जेवण होणं हे साहजिक आहे. आज एकदा जास्त जेवलात म्हणजे तुमचं वजन लगेच एक किलो वाढेल असं नाही. साधारण ५००० कॅलोरीस खाल्ल्यावर एक किलो वजन वाढतं. वजन वाढणे हे एका रात्रीत होत नसून, रोज जेव्हा आपण गर्जे पेक्षा ५००- १००० कॅलोरीस जास्त खातो तेव्हा होतं. अश्या कधी काळी जास्त जेवणाला आहारशास्त्रात ‘डाएट टाईम आउट’ किंवा ‘बींज करणे’ म्हणतात. असं झालं तर निराश न होता, लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा नेहमीच्या आहार आणि व्यायामाच्या रुटीनला लागा. वजन आपोआप संतुलित होईल.

आठवड्याचं डाएट: कुठलं हि वेट लॉस डाएट हे नेहमी पूर्ण आठवड्याचा विचार करून बनवलं गेलं पाहिजे. जर तुम्ही दर शनि-रवि हॉटेल मधे जेवत असाल, तर ते तुमच्या dietician ला जरूर सांगा. जर मध्ल्यावारी (सोम ते शुक्र) जास्त खाणं झालं तर त्या दिवसाला रविवार समजून पुढचे सात दिवस नियमित संतुलित खाणं ठेवा.

वजनाच्या काट्या पासून लांब रहा. आदल्यादिवशी अति जेवल्यावर दुसऱ्या दिवशी काट्यावर वजन वाढलेलं दिसणं अपेक्षित आहे. पण ते वाढलेलं वजन जास्तीच्या आहारातून शरीरात गेलेल्या सोडियम मुळे असते. सोडियम शरीरात पाणी साठवून ठेवतं आणि त्यामुळे वजन वाढलेलं वाटतं. डाएट ला विसरून भरपूर जेवल्या च्या गिल्ट मधे वाढलेले (फसवं) वजन पाहून भर पडते, निराशा येते. म्हणून लगेच वजन करू नये. पुढे ३ दिवस नियमित आहार आणि व्यायाम केल्यावर वजन करावे.

सेन्सिबल आहार आणि व्यायामाकडे परत वळा. खूपदा लोकं पार्टी केली कि पुढील दिवशी दमून पडे पर्यंत व्यायाम करतात. असं करण्याचे दोन तोटे असतात. एक म्हणजे, अति व्यायाम केल्यावर तुमच्या स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. दुसरं, आज एवढा अती व्यायाम करायचा आणि मग पुढे दोन दिवस अंग खूप दुखतंय म्हणून व्यायामाला दांडी मारायची. ह्यानी उलट वजन पुन्हा वाढतं. तसेच, उपास करणं, रात्री न जेवणं अश्या प्रकारांनी शरीर ‘हंगर मोड’ मधे जाऊन, जेव्हा खाल तेव्हा सगळं चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. म्हणून, भूक लागेल तेव्हा लो कॅल, कमी तेल असलेला पदार्थ खा. किंवा कुठलं फळ, सलाड, लस्सी ई. खा, पण उपासमार करून घेऊ नका.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

चिकन हुनान स्टाईल

हुनान हा चीन देशातला एक प्रदेश आहे. इथल्या स्वयंपाकाच्या पद्धतीला ‘हुनान’ पद्धत म्हणतात. त्यात पण बरेच प्रकार असतात. हुनान पद्धतीचे वैशिष्ठ्य म्हणजे आलं, लसूण आणि काळी मिरी व कांद्याचा जास्त प्रमाणात वापर. चायनीज पदार्थात आणि एक प्रख्यात स्टाईल म्हणजे सिशुआन (sichuan). ह्यात सिशुआन मिरी आणि लाल मिरच्यांचा खूप जास्त प्रयोग असतो कि ज्यानी नाक, तोंड, डोळे, कान जिथे शक्य तिथून (:)) धूर निघतो.

सामग्री:
२०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ मोठी रेड पेप्पर
१ मोठी यलो पेप्पर (ह्या लाल पिवळ्या भोपळी मिरच्या मिळत नसल्यास २ शिमला मिरची लांबट चिरून वापर. माझं म्हणजे उगीच फ्याड!)
१०० ग्रॅम किंवा १ कप, चिरलेले मशरूम (आवडत नसल्यास वगळत तरी ‘मेरा क्या जाता है’? काय? )
३ चमचे कॉर्न फ्लॉर
१ बोटा एवढा लांब आल्याचा तुकडा. ह्याला किसून घ्या. तयार पेस्ट वापरलीत तर तुमचा अस्सल हुनान चिकन होणार नाही, इमिटेशन!
१ मूठभर लसणीच्या पाकळ्या, किसलेल्या
१ मोठा कांदा, लांबट चिरलेला
ताजी मिरीपूड, २ चमचा (झेपत नसेल तर कमी घाला बरं का?)
१ मोठा चमचा सॉय सॉस
२ मोठे चमचे तेल
२ कप पाणी किंवा चिकन stock
चवीनुसार मीठ

कृती:

चिकन नीट धुवून, त्याला चाळणीत निथळत ठेवा. चांगलं कोरडं झालं कि मग त्यावर एक चमचा कॉर्न फ्लॉर, १ चमचा काळी मिरीपूड, १ चमचा लसूण, १ चमचा आलं घालून सगळा छान कालवून एका बाजूला ठेवा, १० मि.

एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून घ्या. मग त्यात ते चिकन घालून थोडं शिजवून घ्या. चिकन वरून खरपूस दिसायला हवे. आता हे चिकन एका डिश मधे काढून ठेवा.
उरलेल्या तेलात बाकी लसूण, आलं, कांदा घालून मोठ्या आचेवर भरभर परता (ते ठेल्यावारचे चायनीज वाले करतात न, तसे!).

मग शिमला मिरची आणि मशरूम घाला. चायनीज पदार्थात भाज्या खूप शिजवत बसायच्या नसतात. १ मिनिट परतलं कि मग ते चिकन घाला. मिरीपूड घाला. सॉय सॉस घाला. शेजार पाजार सगळ्यांना कळलं पाहिजे, आज स्पेशल बेत आहे ते- इतपत घमघमाट होईल.

आता उरलेला कॉर्न फ्लॉर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या आणि त्याला त्या चिकन वर ओतून न थांबता हलवत रहा (नाहीतर गुठळ्या होतील). फोटोत दिसतंय तसं जरा दाट झालं (बुडबुडे पण येतील) कि मग सर्व्ह करा. आहो नुसताच नाही, ह्या हाक्का नूडल्स बरोबर.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

फंडा फायबरचा

फ्रूट ज्यूसपेक्षा फळ खावं, ब्रेडपेक्षा पोळी खावी इ. आहारातले फायबर वाढवण्यासाठीच्या सूचना आपण ऐकतो किंवा वाचतो. बिस्किटं, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स असे बरेच मल्टी ग्रेन आणि हाय फायबर प्रोडक्टदेखील आज सर्रास मिळतात. पण हे फायबर नक्की काय असतं? आपल्या आहारात त्याचे काय महत्त्व आहे? कुठले पदार्थ मुळात फायबर रीच असतात?
आहारातले फायबर आपल्याला वनस्पतीतून मिळते. फायबर म्हणजे अन्नातला असा पदार्थ, जो शरीरात शोषून घेतला जात नाही किंवा जो पचनक्रियेतून जात नाही. त्याचे मुळात दोन प्रकार असतात सोल्युबल किंवा विद्राव्य आणि इन्सोल्युबल किंवा अद्राव्य. दोन्ही प्रकारचे फायबर आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून ते मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा बर्‍याच विकारांपासून आपले संरक्षण करतात.

सोल्युबल फायबर
हे शरीरातल्या पाण्याला शोषून घेऊन एक मऊ गोळा बनतं. त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. यांनी आहारातल्या कॅलरी कमी करायला मदत होते आणि मेदोवृद्धी कमी होते. या फायबरमुळे शरीरातले इन्सुलिन कमी वेळात जास्त ग्लुकोज रक्तपेशींपर्यंत पोचवू शकते. तसेच कोलेस्टेरॉल पण कमी शोषले जाते. स्रोत: डाळी आणि कडधान्य, ओट्स, अक्रोड, खारीक, सफरचंद, पेर, जांभूळ, संत्रे, गाजर, काकडी, कोबी इ.

इन्सोल्युबल फायबर
या प्रकारचे फायबर आहारातले रफेज किंवा बल्क वाढवते. शरीरात जाणार्‍या अन्नाचा ऐवज वाढवून हे फायबर पचनक्रियेची गती वाढवतं. याचा मुख्य फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेवर हा एकमात्र उपाय आहे. इसबगोलमध्ये पण याच फायबरचे प्रमाण खूप असते (पण जर रोज इसबगोल घेतलं तर अन्नातले बाकी पोषण पण मिळत नाही). दुसरा फायदा म्हणजे ज्या पदार्थांमध्ये इन्सोल्युबल फायबर जास्त असते त्यात कॅलरी पण तुलनेत कमी असतात (जर त्या पदार्थाच्या कृतीत तळणे, खूप मोहन घालणे किंवा गोड पदार्थ नसेल तर!). त्यामुळे कमी कॅलरी खाऊन पण भरपूर जेवल्यासारखं वाटतं. स्रोत: सर्व असोल्या भाज्या (सालं न काढलेल्या उदा. काकडी, बटाटा, गाजर, बीट) व फळे, कडधान्य, कंदमूळ, गहू, लाल तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इ.

आपल्या आहारात रोज २५-३० ग्रॅम फायबर असले पाहिजे. आहारातले फायबर वाढवले की त्याच बरोबर खूप पाणी पण प्यायला पाहिजे नाहीतर पोटात अन्न कोरडे पडून परत बद्धकोष्ठता होईल. आता २५ ग्रॅम फायबर म्हणजे नक्की काय खायचे? साधारण रोज ४००-५०० ग्रॅम भाज्या आणि २-३ फळं शिवाय पोळी, डाळी खाल्या की २५ ग्रॅम फायबर मिळतं. आहारातले फायबर अचानक वाढवले तर अतिवात पण होऊ शकतो. कायम लक्षात ठेवा, आहारात अचानक कुठला पण टोकाचा बदल केलात तर त्रास होतो. नेहमी हळूहळू पोषण वाढवा.

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया

बृस्केत्ता टोस्ट (इटालियन अपेटायझर)

माझी ही पाक्रु ‘सामना’ च्या फुलोरा आवृत्तीत पण छापून आली होती. त्यावर ‘उपक्रम’ संकेतस्थळावर बरीच चर्चा झाली. चर्चे चा मुद्दा हा होता कि ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये ६५-७५ कॅलोरी असतात तर मग ४ स्लाईस बृस्केत्ता टोस्ट मध्ये २०० कॅलोरीस असे मी कसं लिहू शकते. म्हणून मला इथे हा खुलासा करावासा वाटला. आपण अंतर्जालावर ज्या कॅलोरी काउन्ट वाचतो त्या सगळ्याच बरोबर किंवा आपल्या देशाला, राहणीमानाला अनुरूप अश्या नसतात. उ. दा. क्रीम, पनीर, केक, नान किंवा ब्रेड सारखे पदार्थ. ह्याचे कारण कि इंडिअन आणि पाश्चात्य पोर्शन साईझ मधला असलेला फरक आणि त्या पदार्थाचे ingredients आणि प्रोसेसिंग. आपल्या कडे मिळणारा होल व्हीट ब्रेड ची स्लाईस खूप बारीक असते. संकेत्स्थालान्वरच्या माहिती नुसार १ ब्रेड स्लाईस (२५ग) = ६५- ७५ कॅलोरी पण आपल्या देशात मिळणाऱ्या ब्रेड स्लाईस चे वजन १५-२० ग्रॅम (४०-४५ कॅल) असून ती जास्त बारीक पण कापलेली असते. तर म्हणून ४ बृस्केत्ता टोस्ट मधून सुमारे २०० कॅलोरी मिळतील असं माझ्या लेखात आहे. दुसरा म्हणजे ह्यात ओलिव्ह ओईल फक्त त्याच्या fragrance साठी घातले तर ते लो कॅल होते. जास्त घातलं तर साहजिकच कॅलोरी वाढतील. तर ह्या २०० कॅलोरी च्या हिशोबात ४ ब्रेड स्लाईस (१६० कॅल), १ छोटा चमचा ओलिव्ह ओईल (२० कॅल) आणि ४ टोमाटो (४० कॅल) ~ २२० कॅल असे मोजलेले आहे. (माझ्या कॅलोरी काउन्ट चा स्त्रोत : Nutritive value of Indian Foods, National Institute of Nutrition, Hyderabad हा असतो) असो.

त्यातून, मी कधीच जे खाल ते कॅलोरी चार्ट आणि कॅल्क्युलेटर वर वेरीफाय करूनच खा असं सांगत नाही आणि सांगणार हि नाही. कारण शेवटी सगळ्या कॅलोरिक value ‘indicative’ असतात. चला तर मग, बरंच लांबण लागला ह्या विषयाला. पाक्रु कडे वळूया.

बृस्केता टोस्ट एक पौष्टिक, साधा सोपा पण स्टायलिश पदार्थ आहे. आता जसा उन्हाळा वाढत जाणार तसं आपल्याला शेगडी पाशी कमीतकमी उभं रहावसं वाटणार. त्यातून परत वर्ल्ड कप च्या निमित्ताने मित्र मंडळी पण एकत्र होणार. तेव्हा हा पदार्थ उपयुक्त ठरेल. असं ह्यात काय विशेष आहे? टोमाटो, लसूण आणि ओलिव्ह ओईल. भरपूर टोमाटो असल्याने त्यातले अ‍ॅन्टी ऑक्सीडन्ट लाय्कोपीन, जीवनसत्व अ, ई आणि क, भरपूर फायबर आणि पोटॅशियम (ह्याने रक्त चाप संतुलित ठेवायला मदत होते) ह्या सगळ्याचे गुण आपल्याला मिळतात. शिवाय हा पदार्थ लो कॅल, लो सोडियम, लो फॅट पण आहे.

सामग्री:

४ स्लाईस मल्टिग्रेन किंवा होल व्हीट ब्रेड
४ टोमाटो, बारीक चिरलेले
४ पाकळ्या लसूण, किसून
१ चमचा ओलिव्ह ओईल (एका स्लाईस वर एक थेंब, कॅलोरी मोजत नसाल तर आवडी प्रमाणे घाला)
१ चमचा ऑरेगानो किंवा बेसिल (पिझ्झा बरोबर पाकीट मिळतं ते)
हवं असल्यास अगदी थोडं चीज (अगदी थोडं म्हणजे वासा पुरतं नख भर! जास्त घातलंत तर लगेच खूप कॅलोरी वाढतील )
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार

कृती:

ओव्हन १८० डिग्री प्री हिट करून ठेवा. ह्या साठी टोस्ट मोड (वरच्या आणि खालच्या दोन्ही रॉड ला गरम करणारा मोड) चा वापर करा.
एका बेकिंग ट्रे मधे ब्रेड च्या स्लाईस पसरून ठेवा. प्रत्येक स्लाईस वर चिरलेला टोमाटो (भरपूर प्रमाणात) घाला. मग प्रत्येक स्लाईस वर किसलेला लसूण, ऑरेगानो, मीठ आणि मिरीपूड घाला. प्रत्येक स्लाईस वर १-२ थेंब ओलिव्ह ओईल घाला. हे ओईल फक्त स्वाद वाढवण्या साठी आहे. नसेल तर वगळलं तरी चालेल. सजावटी साठी, एक बारीक तुकडा चीज, स्लाईस वर ठेवा.
हा ट्रे ओव्हन मधे साधारण १० मी ठेवा. ब्रेड टोस्ट होवून कुरकुरीत झाला पाहिजे. टोमाटो साधारण वाफवल्या सारखे दिसतील.
घरी ओव्हन नसेल तरी हा पदार्थ करता येतो. बेकिंग ट्रे च्या ऐवाजी एका नॉन स्टिक पॅन मधे त्या ब्रेड च्या स्लाईस वर दिल्या प्रमाणे तयार करून घेणे. मग हे पॅन मंद आचेवर झाकून ठेवून, ब्रेड खमंग भाजला जाईपर्यंत ठेवा.
गरमागरम बृस्केत्ता टोस्ट पेश करा!

Note: टोस्ट वर पांढरा पदार्थ जो दिसतोय तो किसलेला लसूण आहे. मी मोठा चायनीज लसूण वापरला म्हणून तो एवढा जाड किसला गेलाय. फक्त डावी कडच्या खालच्या चित्रात थोडं नावापुरत मोझारेल्ला चीज घातलेलं आहे, जे वितळले कि पसरते आणि जास्त चीज असल्या सारखे वाटते. हुश्श! किती ते खुलासे!

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात का?

हल्ली बाजारात सगळीकडे ‘हेल्थ फूड्स ‘ ची धूम आहे. जिथे बघावं तिथे ‘कोलेस्टेरोल फ्री’ , ‘फायबर रिच’, ‘शुगर फ्री’, ‘लो कॅल’ इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी ‘unhealthy’ समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा ‘देवकृपेन’ जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे ‘हेल्थ फूड्स’ खरंच एवढे हेल्थी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेन सगळ्यांचाच आहारात अमुक अमुक टक्के ह्या फूड्स चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अश्या लाखो ‘हेल्थ फूड’ कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेयर मार्केट मधे) पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण, मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, ‘हेल्थी’ लेबल असलेले पदार्थ, इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूड मधून मिळणाऱ्या कॅलोरीस चं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट आणि लठ्ठ होतात.

एक साधं उदाहरण घेऊया. एका डायेट जागरूक व्यक्ती समोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ snack ठेवलं तर ते हेल्थ snack घेतील? ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कोन्शिय्स असतील तर बहुदा ५ फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण ह्याच व्यक्तीने त्या हेल्थ snack चा अर्धा पुडा फस्त केला असता.असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलंतरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. ह्याचा अर्थ हा नाही कि ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्स च्या पाकिटावर ‘makes two servings’ हे छापलेलं न वाचता ते माणशी एक पाकीट असं खातो. आणि अश्या वेळी तो ‘हेल्थी’ लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

क्रिमी मशरूम रीसोत्तो (risotto)

रीसोत्तो हा इटालियन भाताचा प्रकार आहे. हा भात अर्बोरिओ राईस वापरून करतात. भारतात आपल्याला अर्बोरिओ राईस बासमती च्या १० पट किमतीला मिळतो. म्हणून मी कधी हा राईस आणलेला नाही, कारण शेवटी तो तांदूळच! ह्या पाक्रु मधे मी घरात असलेला बासमती तांदूळ वापरला आहे. तुम्ही अर्बोरिओ तांदूळ पण वापरू शकता. बरं, रीसोत्तो ची खासियत काय? तांदूळाला आधी बटर, कांदा, हर्ब्स, भाज्या ह्याबरोबर परतून घेणे (आपण पूलावासाठी करतो तसेच) आणि मग त्यात एक एक डाव चिकन किंवा व्हेजिटेबल स्टोक घालणे आणि जरा सरबरीत भात शिजवणे. मी ह्या पाकृत मशरूम फ्लेवर आणण्यासाठी एक शोर्ट कट वापरला आहे. ते म्हणजे maggi ची क्रिमी मुश्रूम सूप पावडर. 🙂 ह्या पाक्रुत खूप कमी बटर आणि चीज असल्याने हि एक चांगली डायेट रीसोत्तो रेसिपी आहे. शिवाय ह्यात मशरूम आणि मटार चे पौष्टिक गुण पण आहेत.

१ कप तांदूळ
४ कप पाणी (थोडं थोडं पाणी घालायचे असल्यामुळे, पाणी जरा जास्त लागते)
१ पाकीट maggi ची क्रिमी मुश्रूम सूप पावडर (दुसरी कुठली वापरली तरी चालेल)
१ छोटा पांढरा किंवा पातीचा कांदा (पात नाही)
१/२ कप मशरूम, चिरलेले (हवे असल्यास)
१/२ कप मटार
१ क्यूब चीज (५० ग)
१ छोटा चमचा बटर
१ चमचा हर्ब्स (हवे असल्यास)
१ चमचा तेल
२ पाकळ्या लसून, बारीक किसून
मीठ आणि मिरी चवीनुसार

कृती:

– एक नोन स्टिक भांड्यात बटर आणि तेल एकत्र गरम करून त्यात लसून, कांदा, मशरूम आणि मटार घालून थोडं मऊ होईपर्यंत परता. मग त्यात धुतलेला तांदूळ घालून तो जरा गुलाबी परता. आता ह्यात मीठ आणि मिरपूड घाला. आच कायम एकदम मंद ठेवा.
– दुसर्या एका भांड्यात सूप पावडर आणि पाणी नित मिसळा. आता हे मिश्रण त्या तांदुळात एक डाव घाला आणि निट मिक्स करा. सूप चे पाणी तांदुळात शोषले गेले कि मग अजून एक डाव पाणी घाला. असं एक एक डाव पाणी घालून तांदूळ शिजेपर्यंत करा. आता साधारण शिजलेला भात जरा ओलसर सरबरीत होईल असं सूप चे पाणी घाला. एक महत्वाची टीप म्हणजे, पाणी थोडं जास्त वाटलं तरी ते लवकरच शोषला जातं हे लक्षात ठेवून थोडं एक्स्ट्रा पाणी ठेवा. आता ह्या रीसोत्तो मधे किसलेले चीज घाला. हवे असल्यास थोडे वरून गार्निशिंग साठी वागला.
– क्रिमी मशरूम रीसोत्तो पेश करा!

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया